|| १ ||
‘काळ तर मोठा कठीण आलाय’ हे वाक्य सर्वच काळात समर्पक ठरते असा
इतिहास असला तरी सध्याचा काळ, म्हणजे विशेषत: गेली २ वर्षे कोरोनाने
आपले जगणेच बदलून टाकले हे खरे आहे. करोनाने लादलेल्या या सक्तीच्या
एकांतात स्वत:ला वारंवार भेटायची वेळ आली आहे खरी. दोस्तो, एक पतेकी
बात सुनाता हु, “ज्याची कंपनी इतरांना आवडते तो लोकप्रिय असतो आणि
ज्याची कंपनी स्वत:ला देखील आवडते तो खऱ्या अर्थाने सुखी असतो, समाधानी
असतो”. या निमित्ताने माझे एक जुने वाक्य मला आठवते. Difference
between loneliness and solitude is that loneliness is full of dark
vacuum while solitude is pregnant with creative possibilities.
एकटेपणा खायला उठतो तर एकांतात नेहमीच अनेक सर्जनशील शक्यता असतात. तर
या करोनाग्रस्त एकटेपणाचे सर्जनशील श्रावणासारख्या एकांतात रूपांतर
करायचे तर त्यासाठी एक छान मार्ग म्हणजे उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन.
मित्रहो, त्याविषयीच काही विचार मांडणार आहे, खरं तर गप्पा मारणार आहे.
विंदा करंदीकरांची ती गाजलेली कविता आहे ना, देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे... तिच्यात थोडासा बदल करून मला नेहमी असे
म्हणावेसे वाटते - लिहिणार्याने लिहीत जावे वाचणार्याने वाचत जावे
वाचता वाचता एक दिवस वाचले त्यावर स्वत: लिहावे स्वत: बि-घडता बिघडता
दुसर्यालाही बिघडवत जावे. वाचता वाचता असे छान काहीतरी घडत जावे. माझे
तर नावच संजय, आणि भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे: संजय उवाच. आणि मी
म्हणतो, उवाच म्हणजे उत्तम वाच. संजया, उत्तम ते वाचत राहा. एखादा कुणी
दिसायला देखणा, गोरापान असतो, एखादीचे डोळे जन्मात:च सुंदर असतात. तर
कुणाचा आवाज अतिशय मधुर असतो, कुणाच्या हातात चित्रकलेचे वरदान असते.
हे सारे आपोआप मिळालेले जन्मदत्त गुण. पण वाचनाचे तसे नाही. संस्कार
आणि प्रयास यांच्या बळावर उत्तम वाचनाची अभिरुची निर्माण करता येते,
जोपासता येते. माझ्या वाचन प्रेमाची कहाणी आधी सांगतो, मित्रहो. शाळेत
असताना एकदा एका ऑफ तासाला पीटीचे पुरंदरे सर वर्गावर आले. आणि
म्हणाले, मी तर पीटीचा मास्तर, मी काय शिकवणार तुम्हाला. मी तुम्हाला
एक गोष्ट सांगतो. आणि त्यांनी ह.ना.आपटे यांच्या ‘उष:काल’ कादंबरीची
गोष्ट सांगितली. गंमत म्हणजे पहिले प्रकरण अतिशय रंगवून सांगत त्या
प्रकरणाची शेवटची ओळ ’आणि आपल्या त्या सावळ्याने भुयारात पाय सोडले..’
हे बरोब्बर तास संपल्याची घंटा संपली त्याबरोबर आले. ते टायमिंग
जबरदस्त होते. त्या प्रकरणामुळे पुढे काय झाले त्याबद्दलची उत्सुकता
इतकी अनावर झाली, की पुढच्या आठ-पंधरा दिवसात वर्गातल्या बहुतेक
मुलांनी कुठून कुठून ‘उष:काल’ ही कादंबरी मिळवून वाचली. ती वाचन
नावाच्या कधीही न संपणार्या श्रावणसोहळ्याची सुरवात होती. त्यानंतर
गुरुनाथ नाईक, एस.एम.काशीकर, व.पु.काळे, शं.ना.नवरे, लक्षुंबाई टिळक,
अरुण साधू, मेघना पेठे, सानिया, गौरी देशपांडे, जयवंत दळवी, खानोलकर,
नेमाडे, कमल देसाई, जीए अशी वळणे घेत घेत वाचन चालू राहिले. या
प्रवासात शेवटी जीए, श्याम मनोहर, कमल देसाई, नेमाडे, ग्रेस अशा पोस्ट
ग्रॅज्युएट अवस्थेला पोचेपर्यंत वयाची पंचविशी आली होती. दरम्यान ऑस्कर
वाइल्ड, मॉम, ऑर्वेल, हेमिंग्वे वगैरे परदेशी वाटाही या प्रवासात येऊन
मिळाल्या होत्या. वाचनाचा प्रवास अव्याहत चालू राहिला. पुढे तर हे वेड
पराकोटीला गेल्यामुळे ४३ व्या वर्षी नोकरीच सोडून लिहा-वाचायला घरी
बसलो. श्रावणसोहळा मात्र चालूच राहिला. मनाला समृद्ध करत राहिला.
दरम्यान काळी अक्षरे उमटलेल्या पुस्तकाच्या शुभ्र कागदाबरोबरच कोर्या
कागदाचेही वेड जडले, ती हाक आली आणि स्वत: सुद्धा पांढर्यावर काळे करत
राहिलो, आधी कागदावर, तर आता कॉम्प्युटरच्या शुभ्र स्क्रीनवर. पण वाचत
आणि लिहीत राहिलो. या प्रवासात कित्येक सुंदर रानवाटा दिसल्या, त्या
वाटेवरची अनवट वासाची फुले खुडताना मनाचा तर श्रावण झालाच पण वेळ कसा
घालवावा हा प्रश्न कधी चुकूनही पडला नाही. एकूणात या छंदात आयुष्य
सुरेख आणि सुरेल होत गेले. भरपूर वाचत गेलो आणि भरपूर लिहीत गेलो. या
प्रवासात मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा उत्तमोत्तम पुस्तकांनी
दिलेला काळजात झुंबर पेटवणारा आनंद मला अधिक मोलाचा वाटत आला. जे जे
उत्तम उदात्त सुंदर पाहिले ते इतरांना सांगावे ही मानवी सहजप्रेरणा आहे
त्यानुसार जे वाचले त्याविषयी इतरांना सांगावे असे नेहमीच वाटत राहिले.
त्यासाठी मग समीक्षासदृष लेखन करत राहिलो. मला उमजलेले अन्वयार्थ
इतरांशी शेअर करावे या हेतूने अंतर्नाद, अनुभव, मटा, लोकसत्ता, साधना
अशा माध्यमातून पुस्तकांविषयी लिहीत राहिलो. या प्रवासातली काही
पुस्तके मात्र अगदी माइल्स्टोन म्हणावी अशी मनावर कायमची कोरली गेली.
पण अशा महान पुस्तकांची यादी करणे आणि पाच-दहा ओळीत अशा श्रीमंत
पुस्तकाची माहिती देणे नेहमीच महाकठिण असते. त्यामुळे आज या निमित्ताने
एक बेगळाच उद्योग करणार आहे. फक्त कथनात्मक साहित्यकृती असलेल्या आणि
मला अतिशय आवडलेल्या वीस पुस्तकांच्या यादीबरोबरच एक वाचक म्हणून अशी
शेकडो उत्तमोत्तम पुस्तके वाचताना माझ्या मनात श्रेष्ठ पुस्तकाची कोणती
लक्षणे तयार झाली ते या निमित्ताने सांगणार आहे. (मला आवडलेल्या २०
पुस्तकांची यादी शेवटी दिली आहे.) लक्षात घ्या साहित्यशास्त्र किंवा
सामीक्षा सिद्धांत वगैरेचा अभ्यास न करता केवळ वर्षानुवर्षे उत्तमोत्तम
पुस्तके वाचून ही लक्षणांची यादी माझ्या मनात तयार झाली आहे. उत्तम
पुस्तक वाचले की ते पुस्तक का आवडले याविषयी स्वत:पुरते टिपण लिहायची
सवय जरूर लावून घ्या, मित्रहो. अशा टिपणातूनच हळुहळू कोणत्या
गोष्टींमुळे पुस्तक उत्तम होते ते आपल्याला कळायला लागते. माझ्या
दृष्टीने उत्तम पुस्तकाची आठ लक्षणे असतात. उत्तम कथात्मक पुस्तकाची
अष्टदर्शनेच म्हणा ना. तर मित्रहो, आधी आपण याच अष्टदर्शनांचीच ओळख
करून घेणार आहोत.
वाचाल तर समृद्ध व्हाल !
- संजय भास्कर जोशी
|| २ ||
मित्रहो, आपण पाहिले की सजगपणे उत्तमोत्तम पुस्तके वाचता वाचता आणि स्वत:पुरते त्या आवडलेल्या पुस्तकाविषयी टिपणे लिहिता लिहिता आपल्याला श्रेष्ठ पुस्तकाची लक्षणे सापडत जातात. तर अनेक वर्षे शेकडो उत्तम पुस्तके वाचून माझ्या मनात तयार झालेली कथात्म साहित्याच्या श्रेष्ठतेची आठ लक्षणे अशी आहेत बघा –
- वाचनीयता : मुळात कोणतीही साहित्यकृती वाचनीय असायला हवी. लेखकाचे जे प्रतिपादन आहे, ते वाचकांपर्यंत पोचायचे तर वाचकाने पूर्ण पुस्तक आनंदाने वाचायला हवे. सुरवातीपासून लेखकाला काय सांगायचे आहे त्याबद्दलचे कुतुहल वाचकाच्या मनात शेवटपर्यंत टिकायला हवे. लक्षात घ्या, वाचनीयता जर वाचकानुनय करायला लागली तर मात्र ते सवंग आणि निंद्य होय, पण वाचकाभिमुख असणे नक्कीच अगत्याचे असते. इथे हे लक्षात घ्या की वाचाकानुनय म्हणजे केवळ वाचकाला जे पसंत आहे ते सवंगपणे पुन्हा पुन्हा देत राहाणे. ते लेखकाने टाळायलाच हवे. पण वाचकाभिमुख मात्र असायला हवे.
- अनिर्णायकता : शक्यतो साहित्यकृती निर्णायक किंवा जजमेंटल नसावी, तर वाचकाच्या सर्जनाला अवकाश आणि उत्तेजन देणारी असावी. म्हणजे सगळेच लेखकाने सांगून टाकू नये तर वाचकाच्या प्रतिभेला त्यात वाव असावा. साहित्यकृतीतल्या दोन ओळींच्या मधल्या रिकाम्या जागा भरत सर्जनशीलतेने केलेले वाचन अधिक समाधानाचे असते. जी कथा संपल्यावर संपत नाही तर वाचकाच्या मनात चालूच राहाते ती उत्तम व्हायची शक्यता जास्त असते. आपण वाचकाला बाळबोधपणे निर्णय आणि निष्कर्ष काढून हातात दिले तर ती कथा तिथेच संपून जाईल.
- लेखकाने निवेदनाने सांगण्यापेक्षा वाचकाला प्रतीती येणे : कथेत जे सांगायचे आहे ते सारेच लेखकाने निवेदनातून सांगू नये तर घटना, प्रसंग, संवाद, पात्रांच्या प्रतिक्रिया या सार्यातून ते वाचकाला प्रतीत व्हायला हवे. “चंद्रया पाटील म्हणजे एकदम बेरकी माणूस बघा...” असे निवेदनातून न सांगता एखाद्या प्रसंगातून पात्राचे बेराकीपण वाचकाला समजले तर वाचकाला अधिक समाधान लाभते.
- चिंतनशीलता आणि जगण्याचे भान : एखादी घटना अनुभवली की लगेच तिची कथा करण्यापेक्षा आपल्या जगण्याच्या चिंतनात ती मुरवून आपल्या प्रतिपादनाला साजेशी पुनर्निर्मिती करणे अपेक्षित असते. घडलेली घटना किंवा हकीकत म्हणजे साहित्यकृती नव्हे तर त्यात आपले चिंतन आणि जग आणि जगण्याविषयीचे भान मिसळले की ती श्रेष्ठ साहित्यकृती होते. त्यासाठी लेखकाचे वाचन आणि चिंतन हवे. जगण्याविषयी भूमिका हवी.
- वाड्मयीन तटस्थता : लेखकाने आपल्या नायकाशी (प्रोटॅगोनिस्टशी) जरूरीपेक्षा जास्त तादात्म्य पावण्याने तटस्थता गमावली जाते. लेखकाने नायक किंवा कोणत्याच पात्राचे वकिलपत्र घेऊ नये आणि आरोपपत्रही ठेऊ नये. अन्यथा लेखक एकच पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवत राहिला तर तो वाचकाच्या सर्जनावर अन्याय होतो. पात्रांचे स्वभाव आणि त्यांच्या वागण्याविषयी जे काय अन्वयार्थ काढायचे ते वाचकाला काढू द्यावे. लेखकाने सतत वाचकाचे बोट धरून गायडेड टूर घडवू नये.
- पात्रांना आपली भाषा बोलू देणे: प्रत्येक पात्र जर लेखकाचीच भाषा (शब्दरचना, शैली आणि विचार या तीनही अर्थाने) बोलू लागले तर साहित्यकृती एकसुरी तर होतेच पण जगाशी आणि जगण्याशी फारकत घेते. त्यामुळे पात्राला त्याच्या त्याच्या स्वभाव आणि संस्कारानुसार बोलू द्यावे. यासाठी निरीक्षण आणि अभ्यास हवा.
- अनैतिकतेचे चित्रण केले तरी गौरवीकरण टाळणे : लेखकाने कोणतेही चित्रण वर्ज्य मानू नये, त्यामुळे नैतिक - अनैतिक, स्वच्छ - अस्वच्छ असे पूर्वग्रह न बाळगता वास्तवाचे संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ चित्रण करायला हवे, पण लेखकाने स्वत: अनैतिकतेचे उदात्तीकरण करणे गैर आहे असे मला वाटते.
- कथेचा गाभा अनुभूती आणि स्वत:च्या जगण्यातून आलेला असणे : हे एक फार महत्वाचे तत्व आहे. फक्त लेखकाच्या स्वत:च्याच जगण्यातून कथा निर्माण व्हावी असा याचा मर्यादित अर्थ नाही तर कथेचा गाभा किंवा मुख्य प्रतिपादन असते ते मात्र लेखकाच्या अनुभूती किंवा प्रतीतीतून यायला हवे. म्हणजे एखाद्या कारकुनाने पायलटच्या जगण्यावर कथा लिहिली तर त्याच्या अनुभूतीच्या मर्यादा येणारच. तो लिहील, सकाळी कामावर गेलो, विमान सुरु केले, पहिला गिअर टाकला... अनुभूतीशिवाय केलेले लेखन उपरे होते. अर्थात कथेच्या पर्यावरणात मात्र अशा बाबी अभ्यासाने येऊ शकतात, यायला हव्या. तर मित्रहो, ही आहेत माझी अष्टदर्शने. म्हणजे उत्तम कथात्म पुस्तकाची आठ लक्षणे. आता यापुढे सजगपणे वाचत राहून वाचनाच्या बाबत राजहंस व्हा ! आपल्या आयडियल कॉलनीतच मी आणि आयडियल कॉलनी मधलेच श्री. माधव वैशंपायन हे दोघे मिळून ‘पुस्तक पेठ’ हे पुस्तकांचे दुकान गेली पाच वर्षे चालवतो. आपल्या आयडियल कॉलनीमधले केतकर, अंबर्डेकर, पटवर्धन वगैरे काही सदस्य नेमाने पुस्तक पेठेत येऊन पुस्तके घेत असतात. ग्रंथ खरेदी ही सर्वोत्तम खरेदी, कारण त्यामुळे आपल्या अक्षर समृद्धीत कायमची वृद्धी होत असते. लवकरच आमचे हे ग्रंथदालन परमहंस नगर परिसरात मोठ्या जागेत स्थलांतरित होत आहे. आपणही पुस्तक पेठेत येऊन आमच्याशी गप्पागोष्टी करत ग्रंथ खरेदीचा आनंद घेऊ शकता. कारण पूर्वी जरी म्हणत असत, की “वाचाल तर वाचाल, तरी आता पुस्तक पेठेचे आवडते वचन आहे – वाचाल तर समृद्ध व्हाल !
वाचकांच्या प्रतिक्रिया
राजहंस पुस्तक पेठ
पुस्तक पेठ सर्व वयोगटातील आणि अभिरुचीच्या पुस्तकप्रेमींसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही पुस्तकांचा खजिना सादर करते.
