राजहंस पुस्तक पेठ

राजहंस पुस्तक पेठ

पुस्तक प्रेमी निवृत्त बँकर श्री. माधव वैशंपायन आणि कॉर्पोरेट विश्वातून केवळ त्रेचाळीसाव्या वर्षी लेखन वाचनासाठी निवृत्ती घेतलेले कादंबरीकार-समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी २०१६ साली ‘पुस्तक पेठ’ सुरु केली आणि पुढे घडला तो इतिहास सर्वज्ञात आहे. पुस्तक पेठेने पाच वर्षात ग्रंथवितरणाच्या क्षेत्रात आपली आगळी ओळख निर्माण केली. आकर्षक सवलत योजना, सतत अभिनव उपक्रम आणि स्वत: लेखक आणि समीक्षक असलेल्या संजय जोशींच्या विक्री, विपणन (मार्केटिंग) कौशल्याने आणि ग्राहकांशी साधलेल्या ग्रंथप्रेमी संवादामुळे पुस्तक पेठ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. शिवाय साहित्यक्षेत्रातील सर्वदूर पसरलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे अनेक लेखक, कलावंत, अभिनेते, चित्रकार मित्र पुस्तक पेठेत येत राहिले, अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करत राहिले. व्हायचे तेच झाले. रसिकांनी पुस्तक पेठेला अमाप प्रेम तर दिलेच पण सातत्याने व्यवसाय वाढवत राहायची उमेद दिली. परिणामी पुस्तक पेठेने जागेचा विस्तार केला, नाशिक मध्ये नवी शाखा उघडली... पुस्तक पेठ वाढत राहिली.

२०२२ मध्ये पुस्तकप्रेमी जमातीला केवळ दिलासाच नव्हे तर उभारी आणि उमेद देणारी एक घटना घडली. केवळ पाच वर्षात जनमानसातील आपल्या प्रतिमेचा ठसा ठळक करून हजारो वाचनप्रेमी रसिकांचे अपार प्रेम संपादन करणारे पुण्यातले ग्रंथदालन ‘पुस्तक पेठ’ आणि मराठी ग्रंथव्यवहारावर आपला अमिट ठसा कायम करून उत्तम दर्जा आणि ग्रंथविश्वातील श्रेष्ठतेशी कायमचे नाते जपणारी संस्था ‘राजहंस प्रकाशन’ हे येत्या ३१ मार्च २०२२ रोजी एकत्र येत आले आणि पुस्तक पेठ आता “राजहंस पुस्तक पेठ” झाली आहे.

या प्रसंगी श्री माजगावकर म्हणाले, की पुस्तक पेठेने अल्पावधीत केलेले काम आम्ही कौतुकाने पाहात होतो आणि कोणत्याही नव्या गोष्टीचे स्वागत करणे ही राजहंसची परंपरा आहे. आम्ही आजवर उत्तमोत्तम ग्रंथ निर्मिती आणि त्या ग्रंथांचे वितरण यशस्वीपणे केले पण एकुणातच ग्रंथविक्री आणि वितरण या क्षेत्रात या निमित्ताने आम्ही आता दमदार पाउल टाकत आहोत. आमची परंपरा आणि मूल्ये यांच्या प्रकाशात आम्ही पुस्तक पेठेच्या साथीने ‘राजहंस पुस्तक पेठ’ हा प्रकल्प यशस्वी करू हा विश्वास आहे.

याबाबत बोलताना पुस्तक पेठेचे संजय भास्कर जोशी म्हणाले, की राजहंस सारख्या अतिशय मातब्बर आणि अनुभवी संस्थेचे पाठबळ मिळणे ही पुस्तक पेठेच्या नशिबातली सर्वात भाग्यवान घटना आहे. ग्रंथविश्वातील राजहंसचे स्थान इतके मोठे आहे, की हा प्रकल्प म्हणजे पुस्तक पेठेला मिळालेले सर्वाधिक मोलाचे वरदान आहे, खरे तर आम्हाला मिळालेली दाद आहे. आम्ही अर्थातच अजून खूप नवे आहोत, पण राजहंससारख्या संस्थेचा हात आमच्या पाठीवर असेल तर पुस्तक पेठ आता ‘राजहंस पुस्तक पेठ’ या नव्या रूपात नवनवी आव्हाने स्वीकारून यशाची नवी शिखरे गाठायला उत्सुक असेल.

नुकतेच पुस्तक पेठेने नव्या भव्य वास्तूत स्थलांतर केले असल्याने आता ‘राजहंस पुस्तक पेठ’ पौड रोडवर वनाज जवळ, परमहंस नगरात रसिकांचे स्वागत करायला उत्सुक असेल. अत्यंत आकर्षक सवलतीच्या सदस्यत्व योजना, वेळोवेळी सादर केल्या जाणाऱ्या अभिनव योजना, लेखक भेटींचे कार्यक्रम आणि अत्यंत ग्राहकाभिमुख वातावरणात संजय भास्कर जोशी यांच्या बरोबरीने वाचकांच्या सेवेत असलेल्या ग्रंथप्रेमी आणि अगत्यशील कर्मचार्यांचा समुदाय तुमच्या स्वागताला उत्सुक असेल. तेव्हा ‘राजहंस पुस्तक पेठेने’ रसिकांना आग्रहाचे आवाहन केले आहे, की आवर्जून या सोहळ्यात सामील व्हा, आपली अभिरुची उन्नत करा आणि आपल्या रसिकतेचा राजहंस जागृत करा. वारंवार पुस्तक पेठेत या, कारण वाचाल तर वाचाल इतकेच नव्हे तर वाचाल तर समृद्ध व्हाल.

वाचकांच्या प्रतिक्रिया